• info@anamprem.org
  • 7350013801 / 9011670123

“राहत”च्या स्नेह प्रमाने सुखावले लॉक डाऊन मधील कष्टी वाटसरू. भारत टराटरा फाटत असल्याची स्थलांतरित मजुरांना पाहून झाली कार्यकर्ते यांची भावना

Start time 2020-05-13
Finished Time 2024-10-21 21:32
Speakers
Content

लॉक डाऊन चा कालावधी, प्रवासावर निर्बंध आणि सतत कोरोनाची टांगती तलवार यामुळे मुंबई-पुणे-ठाणे आदी औद्योगिक क्षेत्रातून मजूर मूळगावी परत निघाले आहेत. कोरोनात महाराष्ट्र रेड झोन मध्ये आहे. मोठी शहरे कोरोना प्रादुर्भावाच्या लाल रेषेत गडद होत आहेत. यामुळे भीतीने अनेक मजूर चालत,सायकल वर,कंटेनर,मोठ्या ट्रक, टेम्पो,रेल्वे रूळ यावरून मिळेल त्या पर्यायाने गावाच्या दिशेने धावत आहेत, त्यांना जीवाची पर्वा अजिबात राहिली नाही. इंडिया मधून लोक भारताच्या दिशेने पोटतिडकीने निघालेत.

हे सर्व चित्र केवळ विचित्र नसून एखादे कापड फटावे तसे देश फाटत असल्यासारखे चित्र आहे. हे पाहून डॉ.गिरीश बाबा यांच्या तत्वानुसार मी नाही तर कोण..? आज नाही तर कधी..? या विचाराला समोर ठेवून स्नेहालय , अनामप्रेम, आय लव नगर, रोटरी क्लब,लायन्स क्लब,स्वयंसेवी संस्थांचा महासंघ आणि अहमदनगर जिल्हा वासीय यांच्या वतीने नगर-मनमाड बायपास हायवे वर पायी अथवा सायकलवरून जाणाऱ्या मजूर लोकांकरिता अन्न-पाणी-प्रथमोपचार,रस्त्यांची माहिती देणारे पहिले प्रायोगिक पातळीवर *राहत केंद्र* काल 11 मे 2020 रोजी सायंकाळी 4 वाजता सुरू करण्यात आले. डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ.महेश मुळे, राजीव गुजर, अनिल गावडे, दीपक बुरम, दिव्यांग कार्यकर्ते ज्ञानेश्वर गडाख, विष्णू वारकरी,महेश सूर्यवंशी, विशाल अहिरे, योगेश गवळी,विकास रंजना गुलाब यांच्या उपस्थितीत या केंद्राची सुरुवात झाली.

*मनातल्या आहट वरील उपाय “राहत”*

मागील 2 महिन्यापासून सतत कोरोना या विषयाचा भडीमार होत आहे. सर्व जग कोरोना या महामारीची शिकार होत आहे. अर्थव्यवस्था पुरती ढासळली आहे. यामुळे हे पायी मजुरांचे लोंढे घर-गावाकडे निघाले आहेत. लहान लेकरे,बाया,वृद्ध,दिव्यांग यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.देशात काय होतंय हे कोणालाच काही समजत नाही. परिस्थिती चे आकलन अजिबात होत नाही. मीडिया फक्त फसफसत आहे. काल 11 मे 2020 रोजी दुपारी 4 वाजता संस्थेच्या उपलब्ध साहित्यावर “राहत” चे काम सुरू झाले. मुंबईतील अरुण भाई शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची रचना करण्यात आली.

*पहिली जुळवाजुळव*

संसर्ग टाळण्याची सर्व दक्षता घेत राहत चा आरंभ झाला. हे केंद्र सुरू करायचे म्हणून लागलीच अनामप्रेम च्या सत्यमेव जयते ग्राम चे प्रमुख विष्णू वारकरी यांनी 8 किलो तांदूळाची खिचडी बनवली. ज्ञानेश्वर व अनामप्रेम टीमने पाणी ड्रम, टेम्पो हे सगळे घेतले. चाईल्ड लाईन टीम , स्नेहाधार टीम, युवा निर्माण,डॉ महेश मुळे स्वतः डॉ. गिरीश बाबा, आम्ही सर्वजण नगर मनमाड रोड ला जागा शोधत ” राहत”चा स्टोल उभा केला. रस्त्याने जाणारे मजूर जिकडे भेटले तिकडे लगेच भर उन्हात टेम्पो लावून केंद्र कामास सुरुवात झाली. पहिले काम व नंतर येणाऱ्या अडचणीवरून पुढील नियोजन असे करायचे ठरले. दुपारी 4 ची वेळ असल्याने खुप उन्ह असल्याने चालून चालून दमलेले,सायकलवरून जाणारे मजूर महामार्गावर मिळेल त्या सावलीला बसले होते. आम्ही खिचडी,पाणी चा स्टोल लावला की लगेच 40 एक मजुरांची रांग समोर आली. हात धुवून सॅनिटायर लावून या मजुरांना पाणी ,नाश्ता, बिस्किटे दिली. सर्वजण क्षणभर सुखावले. सर्वांशी आम्ही बोललो. पहिल्यांदा जे मजूर भेटले ते अलाहाबाद ला पायी मुंबईवरून निघाले होते. सोबत जेमतेम एक पाठीवर पिशवी,पाणी बाटली होती. बऱ्याच जणांच्या पायात चपलाही नीटनेटक्या नव्हत्या. मजूर कोणती ट्रक , रेल्वे मिळतेय का..? याची चौकशी आकांताने करीत होते. काही मिळाले नाहीच तर गावाकडे चालत जायचेच या इराद्यात सर्वजण होते. पुढे दिवस थोडा कलला. आम्ही रात्री लाईट च्या हिशोबाने स्टोल लावण्याच्या विचारात होतो. अनेक हॉटेल महामार्ग वर आहेत. सद्यस्थितीत लॉक डाऊन मध्ये ती बंद आहेत. आम्ही कोणते हॉटेल मिळते का..? जेणे करून त्या हॉटेलच्या दारात “राहत” चा उपक्रम आपल्याला चालवता येईल याच्या विचारात होतो. भाऊसाहेब गायकवाड यांचे साई दरबार हॉटेल, पाठक पेट्रोल पंपाजवळ आहे. निंबळक गावातील भाऊसाहेब गायकवाड व परिवार हे स्नेहालय-अनामप्रेम संस्था याचे हितचिंतक. *राहत केंद्रला* लगेच भाऊसाहेब यांनी त्यांच्या हॉटेल दारातील जागा व लाईट व्यवस्था केंद्राला देऊ केली. आम्ही ची जागा बदलून राहत स्टोल थेट भाऊसाहेब गायकवाड यांच्या हॉटेल दारात मांडला.

*अंधारात भारत चाले*

दिवस मावळला. अंधारून आले. मजुरांचे लोंढे च्या लोंढे आम्ही रस्त्यावर पाहू लागलो. पायी ,सायकल व आता दुचाक्या सुद्धा झुंडीने दिसू लागल्या. मेंढरे भरल्यागत मोठ्या ट्रक- टेम्पो माणसांनी भरलेले डोळ्यांनी पाहिले. जीव गलबलला साऱ्यांचा. यातच एक ग्रुप अंधारात आला. आम्ही रस्त्याजवळ उभारून ‘पानी-खाना मोफत’ अशा आरोळ्या ठोकून मजुरांना आवाज दिला. असंख्य जण केंद्रावर आले. आलेला ग्रुप दुचाकी वरून पुण्यावरून दिल्ली-आग्रा येथे निघाला होता. त्यात एक 4 वर्षाचा सूरज वर्मा नावाचा मुलगा होता. गर्दी व प्रवासाने गदगदून गेला होता. चौकशी केल्यावर समजले की त्याची आई मिळेल त्या वाहनाने पुढे इंदोर च्या दिशेने गेलीय.हा मागे राहिला आहे. बापासोबत चालला आहे. त्याची अवस्था पाहवत नव्हती.

या सर्व दुचाकी गटाला विचारले तर समजले की हे लोक बांधकामात POP चे काम मुंबईत करतात. कोरोनामुळे आयुष्यात कायमचीच मुंबई सोडून जायचे म्हणून हे सर्व निघालेत. हे सगळे ऐकून महासत्ता शब्द डोक्यातून गळून पडला.

पुढे एक मोठा 200 शे पेक्षा जास्त लोकांचा लोंढा आला. केंद्र चालू करताना वाटले होते की आज आपण आणलेली खिचडी संपेल अशी शंका होती. आता आणलेली खिचडी, बिस्किटे लागलीच संपली. अजून एक मोठे पातेले भरून पुन्हा खिचडी शिजवायला घेतली. इकडे आलेल्या गर्दीला बोलल्यावर बऱ्याच गोष्टी समजल्या. हे लोक सुपा MIDC मधून गाझियाबाद ला निघालेत. त्यांना टेम्पो ने कोणीतरी राहुरी जवळ सोडले. आज नगर रेल्वे स्टेशन वरून ट्रेन आहे असे कोणीतरी अंधारात म्हणाले. म्हणून ही गर्दी नगर रेल्वे स्टेशन शोधत पायी निघालीय. या गर्दीत नवीन लग्न झालेले एक दाम्पत्य होते. औरत का नाम क्या..? विचारले तर समजले की, ही मालन…!! या नावाची नवी नवरी चालून चालून भेंडाळली होती. भाईसाहब, ट्रेन मिलेगी क्या..? असे विचारले तर उत्तर काय द्यावे समजेना.. गर्दीला लवकर घरी पोहचणे आहे. इकडे कुठे कोरंटाइन न होता लवकर गाव जवळ करायचे होते. चौकशीत विचारले तर फारसे कोणी बोलत नाही. संसर्ग टाळावा म्हणून आम्हाला जपून ,दुरून बोलावे लागते. त्यात मास्क लावल्याने स्पष्ट ऐकता येत नाही. सगळे संवादाचे प्रश्न आणि प्रश्न आहेत. प्रशासन व रेल्वे, बस व्यवस्था यांचे काही समजत नाही. शासनाच्या सतत सूचना, निकष बदलल्याने लोक गोंधळून गेले आहेत. भूक बळीची प्रचंड भीती कोरोनापेक्षा जास्त आहे. रस्त्यावर अपघात मोठे होतील. अशी भीती आहे.

पुढे दाट अंधार होत गेला आणि डोळ्यातून पाणी यावे असे दृश्य पाहिले. साधारण 8 ते 12 लोक त्यात 3 एक बायका होत्या. यात लेकुरवाळी एक बाई होती. या घोळक्यात चार एक वर्षाची एक पोरगी अक्षरशः फरफटत तिच्या बापाचा हात धरून चालत होती. अंधार होता,रस्त्यावर हे दृश्य होते. लेकरू रडत होते. आम्ही काय करावे हे कळेना… ? निशब्द सगळे……!! तो घोळका अंधारात बुडून गेला. दुसरा दिवस उगवलाय तरी ते रडणे आणि ते दृश्य डोळ्यासमोर ठळक आहे. अजून हे दृश्य डोळ्यासमोर जाता जाईना…!!ते आहे तसेच आहे.

यानंतर रात्री चाइल्ड लाइन टीम व किरण आचार्य व सतीश देशमुख यांनी हे केंद्र सांभाळले. आज सकाळी 10 ला अनिल सर आणि गिरीश बाबा यांनी केंद्राची सूत्रे हाती घेतली. आज राहत केंद्रा वर पाणी व्यवस्था व मंडप,चार्जिंग व्यवस्था उत्तम करण्याचा प्रयत्न केलाय.

मन सुन्न करणारी ही “राहत ” आहे… फाळणीनंतर अदृश्य विषाणू टराटरा भारत फाडत आहे हे नक्की.