• info@anamprem.org
  • 7350013801 / 9011670123

पायपीट करणाऱ्या मजुरांना ‘राहत’ द्वारे प्रवासी बस उपलब्ध.जय हिंद च्या घोषणेने तारकपूर आगार भावुक

Start time 2020-05-17
Finished Time 2024-10-21 21:32
Speakers
Content

लॉक डाऊन- 4 चा आज शेवटचा दिवस. काल स्नेहालय-अनामप्रेम परिवाराच्या राहत केंद्रा वर पायी चालत तब्बल 62 मजूर आले. चाकण व पुणे येथे हे लेबर काम करणारे मजूर होते. झारखंड,उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल,बिहार,छत्तीसगड या राज्यातील हे मजूर. लॉक डाऊन,रोजगार बंद, कोरोनाची भीती यामुळे या मजुरांना पायी गाव गाठायचे होते. एवढे मजूर त्यांच्या राज्यात शेकडो किमी अंतर पायी कसे जाणार..? हा प्रश्न सर्व कार्यकर्ते यांना सतावत होता. या मजुरांमध्ये 4 जोडपी होती. यातील महिलांची स्थिती पायी चालल्याने दिनवाणी झाली होती. प्रशासन आणि परिवहन,आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून केवळ ‘फोनाफोनी’ न करता या मजुरांसाठी प्रत्यक्ष काम करायचे हे “राहत टीम” ने ठरविले. काल रात्रभर हे मजूर राहत केंद्रावर झोपले. त्यांची जेवण,संडास-बाथरूम-पाणी यांची व्यवस्था राहत टीम ने केली. यावेळी प्रशासन व परिवहन विभागातील सर्व अधिकारी यांच्याशी ‘राहत टीम’ बस उपलब्ध व्हावी म्हणून बोलणे करीत होती.

प्रवासास बस मिळण्यास राहत केंद्रावर एक मुक्काम करावा लागणार हे मजुरांना समजवण्यात राहतला यश मिळाले. नाहीतर आम्ही पायी जाऊ , अशी बस आम्हाला मिळणार नाही, आम्हाला 14 दिवस कोरंटाइन करतील…!! अशी मते मजुरांची होती. यातील बहुतांशी मजूर हे पेंटिंग ची कामे करणारे लेबर होते. त्याच्या ठेकेदाराने त्यांना मागील 2 महिन्यात मजुरी न दिल्याने व पुढील काळ अनिश्चित असल्याने ते रिकाम्या खिशाने पायी निघाले होते.

या मजुरांतील शिवसागर याच्याशी बोलल्यावर परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे लक्षात आले. ठेकेदार व कंपनी यांना जरी माणुसकीच्या नात्याने मजुरांना लॉक डाऊन काळातील पगार,मजुरी देण्यास शासनाने सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र मजुरांच्या हाताशी निराशा आली आहे. भूक आणि कोरोना भीती यामुळे आम्ही गावी जात आहोत, असे सर्वांचे म्हणणे होते.

आज सकाळचा सूर्योदय या मजुरांना बस मिळेल ही आशा घेऊन झाला. सर्वांना चहा-पाणी -अन्न -स्वच्छतागृह- मोबाईल चार्जिंग व्यवस्था मिळाल्याने दमलेले मजूर ऊर्जावान वाटत होते. सर्व मजुरांना स्नेहालय स्कुल बस द्वारे तारकपूर आगारात 10 वाजण्याच्या सुमारास पोहचवले. तारकपूर आगारात आल्यावर असे लक्षात आले की इथे आधीच शेकडो मजूर उभे आहेत. त्यांचे सामान, बायका, लेकरे उन्हात बस व्यवस्था याकडे डोळे लावून आहेत. इकडे आगारात सतत येणारी गर्दी,कायदेशीर प्रकिया,तपासणी आदी करून करून अधिकारी वर्ग,चालक-वाहक, आरोग्य विभाग अक्षरशः दमून गेला आहे.

आगारात सर्व मजूर पोहचण्यास स्नेहालय स्कुल बस च्या 3 चक्कर झाल्या. सर्व मजूर एकत्र सावलीत रांगेत,अंतर ठेवून बसवण्यात आले. प्रक्रियेतील पहिला टप्पा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मा. कल्पेश सूर्यवंशी यांनी अत्यंत प्रेमाने समजून सांगितला. मा. जागृती फटांगरे- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सर्वांच्या नोंदी नोंदणी पत्रकात घेतल्या. आगारात पाणी-अन्न अशी कोणतीच सोय नाही, याचे कारण मजूर संख्या व अंतर पाळणे, लॉक डाऊन यामुळे काही सोय होऊ शकणे अवघड दिसले. हे पाहून आपण बिस्किटे-पाणी भेळ भत्ता याचा आपल्याच गाडीवर एक स्टोल लावला. लेखी प्रकिया पूर्ण करून जाणारे बस वाहक देखील आपण उभारलेल्या मदत स्टोल वरून पाणी,बिस्किटे घेऊन जात होते. येथे आगारात अविनाश मेमाणे,सतीश लोढा, सुनील आहुजा, नागर देवळे ता.नगर येथील तरुण शेतकरी विजय खरपुढे हे स्व-खर्चाने बिस्किटे,बालकांना-गर्भवती महिलांना दूध देत होते. आम्हाला पाहून सर्वजण एकत्र आले. आमची नव्यानेच ओळख झाली असली, तरी एकाच बिरादरीतील आपण आहोत अशी भावना आमची झाली. आम्ही सर्वजण एकमेकांना मदत करीत मजुरांना देखील वस्तू वाटप करीत होतो. मजुरांना सूचना देत होतो.

सर्व मजुरांची नोंदणी पत्रकात नोंदणी झाल्यावर आरोग्य तपासणी करण्यास वाहक देवराम गीते यांनी मजुरांच्या रांगा लावल्या. परिवहन निरीक्षक मा. अविनाश गायकवाड यांनी मजुरांना आम्ही मोफत महाराष्ट्र सीमेपर्यंत सोडवत असल्याचे सांगितले, कोणी कोणाला पैसे देऊ नये, असे देखील आवर्जून आगारात ओरडून सांगितले. यामुळे मजूर आश्वस्त झाल्याचे दिसले. डॉ.सौरभ मीस्सर, डॉ.अमित पालवे,डॉ.शुभांगी सुर्यवंशी यांनी सर्व राहत केंद्राद्वारे आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी केली. परराज्यात जाणाऱ्या मजुरांचे दोन विभाग करण्यात आले. पहिला विभाग छत्तीसगढ-मध्यप्रदेश-झारखंड याकरिता 2 बस सोडण्यात आल्या. दुसरा विभाग उत्तर प्रदेश-बिहार-पश्चिम बंगाल याकरिता 2 बस सोडण्यात आल्या. मा. राहुल सरोदे -सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी इतर मजूर आगारातून गोळा करून संख्या पुर्ती केली. प्रत्येक बस मध्ये 24 प्रवासी बसवण्यात आले.मध्यप्रदेश- छत्तीसगढ-झारखंड करिता देवरी जि.नागपूर इथपर्यंत महाराष्ट्र सीमेपर्यंत मोफत बस रवाना झाली तर बिहार-पश्चिम बंगाल-उत्तरप्रदेश साठी शेंदवा जि. धुळे इथपर्यंत महाराष्ट्र सीमेपर्यंत बस पाठवण्यात आली. एकूणच जवळजवळ 800 किमी पर्यंतची पायपीट मजुरांची टळली. जाताना बस मध्ये बसलेले सर्व मजूर हात जोडून,डोळे मिटून धन्यवाद देत होते. आम्ही प्रत्येक मजुराला पाणी- भेळभत्ता-बिस्कीट पुडा हातात दिला. जाताना सर्व मजूर यांनी जय हिंद च्या, भारत माता की जय आणि जय महाराष्ट्र या घोषणा मनापासून दिल्या. यामुळे आगारातील वातावरण भावुक झाले होते. अधिकारी वर्ग, आम्ही कार्यकर्ते आमचे डोळे पाणावले. निघालेल्या बस मधून सर्व मजुरांना आपल्याच घरातील माणसांना प्रेमाने दाखवतो तसे निरोपाचे हात एकमेकांनी दाखवले. कायम मनात राहणारा आजचा अनुभव होता.

राहतच्या या मजुरांना बस मिळवून देण्याच्या प्रयत्नाला फलद्रुप केले ते मा. संतोष माने -मोटार वाहन निरीक्षक, मा.धनंजय देवकर- मोटार वाहन निरीक्षक, मा.श्रीराम पुंडे-सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, गोरक्ष कोरडे-सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, मा.हनुमंत पारधी-सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी. नगर तालुक्याच्या नायब तहसीलदार प्रविणा तडवी व नगर जिल्हा आर.टी. ओ. प्रमुख दीपक पाटील सर आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे श्रीयुत गीते साहेब यांची खूप मदत या मजुरांची पायपीट थांबवण्यात झाली आहे.

राज्यांतर्गत वाहन व्यवस्था अजून उपलब्ध झाली नसल्याने अनेक मजूर अद्याप राज्यातल्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पायीच जात असल्याने टीम राहत ने राज्यांतर्गत बस ची गरज प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.