कोरोना आरिष्टात अनामप्रेमच्या दिव्यांगांनी आखली दिनचर्या; सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात आरोग्यदायी जीवनशैलीस आरंभ
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केले आहे. पहिल्यांदा लॉक डाऊन जाहीर झाल्या झाल्याच अनामप्रेममधील सर्व दिव्यांग मुले-मुली नगर शहराजवळील सत्यमेव जयते ग्राम या प्रकल्पात एकत्रित झाले आहेत. येथे या लॉक डाऊन काळात अंध-अस्थिव्यंग-मूकबधिर-अपंग असे 60 दिव्यांग कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कटिबद्ध आहेत.
*अनोख्या दिनचर्येत दिवसाची विभागणी*
सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प हा निंबळक ता.जि. अहमदनगर येथील शिवारात आहे. येथे प्रकल्प उभारणीपासून वृक्ष संगोपन-संवर्धन सुरू आहे. मोकळी जागा, भरपूर झाडी, निसर्गाच्या कुशीत हा प्रकल्प आकाराला येत आहे. कोरोना संकटात अनामप्रेमची ही सर्व मुले या प्रकल्पात आहेत. येथे लॉक डाऊन काळातील प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते. रोज सकाळी योगासने,सूर्यनमस्कार व प्राणायाम येथे केले जाते. आकाशवाणीवरील बातम्या ऐकून सर्वजण फ्रेश होतात. यानंतर ऑनलाइन वृत्तपत्र वाचन केले जात आहे. दुपारी बुद्धिबळ,कॅरम, संगणक, दूरचित्रवाणी वरील कार्यक्रम पाहिले , ऐकले जातात. अनामप्रेम ने बहुतांशी लाभार्थी यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिल्याने ऑनलाईन मित्रांशी चॅटिंग व नेट वरील कोरोनाबाबत माहिती,जगभरातील बातम्या मुले-मुली ऐकत आहेत. सायंकाळी येथील प्रकल्पाच्या मैदानावर उपलब्ध असलेली झोका,घसरगुंडी आदी खेळणी खेळत आहेत. सायंकाळी प्रार्थना होते. रोज येथे 2 तास अनुवाचन केले जाते .यामध्ये वृत्तपत्र शिवाय वाचनालयात असणाऱ्या कादंबऱ्या वाचल्या जात आहेत. डोळस कार्यकर्ते अनुवाचन करून मुलांना वेगवेगळी पुस्तके वाचून दाखवत आहेत.
*आरोग्य केंद्रित जीवनशैली*
दिव्यांग मैदानावर खेळताना, बसल्यावर सामाजिक अंतर पाळत आहेत. येथे मास्क कायम वापरला जात आहे. हिरव्या भाज्या,भाकरी, डाळ-तांदूळ तसेच गुळवेल याचा रोजच्या खाण्यात वापर केला जातोय. सुंठ,आले यांचा काढा रोज येथे दिवसातून 2 वेळा मुले पीत आहेत. हात धुण्यासाठी साबणाचा वापर मुले दर तासाला करतात. कोरोना संसर्गात काळजी घेणे दिव्यांग गटास आव्हानात्मक आहे परंतु अंतर पाळणे, साबणाने हात धुणे, मास्क वापरणे या बाबी पाळल्या जात आहेत. मुलांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून येथे गावरान गायी पाळल्या जातात,त्याचेच दूध आहारात वापरले जात आहे. प्रत्येक दिव्यांगांने आरोग्य अँप स्मार्ट फोन मध्ये डाऊनलोड केले असल्याने कोरोना बाबत दिव्यांग सतर्क राहत आहेत.
*किराणा सहयोग अभियानातून माजी विद्यार्थ्यांना मदत*
अनामप्रेम च्या माध्यमातून संस्थेत शिकलेल्या माजी विद्यार्थी यांची आठवण संस्थेने ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणीतील दिव्यांगांच्या कुटूंबाना अनामप्रेम ने किराणा किट दिले आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू-अन्न धान्य गरजूंना दिले आहे. वाढलेल्या लॉक डाऊन काळात दिव्यांगांची कसोटी लागणार आहे. यामुळे अनामप्रेमच्या माजी दिव्यांग लाभार्थी यांनी किराण्याच्या मदतीसाठीअनामप्रेम ला सम्पर्क करण्याचे आवाहन दिव्यांगांना करण्यात आले आहे. सद्यस्थितीत किराणा किट हे नागापूर एम.आय.डी. सी. व नगर शहरातील गरजू 46 दिव्यांग कुटुंबे यांच्यापर्यंत पोहचवले आहे.
*कोरोना संकटात दिव्यांगांकडे विशेष लक्ष आवश्यक*
कोरोना महामारी मध्ये दिव्यांग मुला-मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अंधाना मास्क वापरणे व सामाजिक अंतर पाळणे,सतत हात धुणे कठीण होते. जे अस्थिव्यंग सरपटत पुढे पुढे जातात, चाकाची खुर्ची वापरतात त्यांचे संसर्ग टाळणे खूप अवघड आहे. रोजच्या जगण्यात काय काय निर्जंतुक करणार..? असा प्रश्न दिव्यांग मुला-मुलींना पडला आहे. एक प्रकारची निराशा या मुला-मुलींमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिव्यांग मुला-मुलींचे जगणे सुसह्य होण्यासाठी सरकारने खालील मुद्दे विचारात घ्यावे
1)या दिव्यांगांना पैसे काढण्यासाठी मोबाइल बँकिंक व्हॅन तालुक्या-तालुक्यात पोहचवणे आवश्यक आहे.
2)ज्या दिव्यांगाना वैद्यकीय उपचार हवे असतील तर अशा दिव्यांग यांच्याकरिता एक हेल्पलाईन गरजेची आहे. वैद्यकीय डॉक्टर यांची मदत दिव्यांग याना गरजेप्रमाणे प्रत्येक तालुक्यापर्यंत व्यवस्था केली जावी.
3)सांकेतिक भाषेत मूकबधिर यांना कोरोना बाबत दूरचित्रवाणी वरून सतत संदेश देणे आवश्यक आहे.
4)मतिमंद मुलांची औषधें ही शासनाने पोहच करणे आवश्यक आहे. त्यांना संसर्ग होऊ नये व झालाच तर वेगळ्या विलगिकरण व्यवस्था आवश्यक असणार आहे.
5)दिव्यांग मुला-मुलींसाठी वेळ आलीच तर सुगम्य विलगिकरण कक्ष असणे आवश्यक असणार आहे.
6)स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अँप व व्हिडिओ च्या माध्यमातून या दिव्यांगांना शाळेशी जोडून ठेवणे या काळात आवश्यक आहे.