मजुरांचे हाल संपेना; त्यांना उत्तर काय द्यावे कळेना..?
पायपीट करणारे मजूर ,सायकलवर जाणारे मजूर रस्त्यावरून गाडीत-वाहनात-ट्रेन मध्ये बसले असे वाटते. पायपीट संपली असे काही काळ वाटते. तेवढ्यात जथाच्या जथा राहत केंद्रावर येतो. सायकलवर एखादा मोठा ग्रुप येतो. दमलेले मजूर पाहून वाटते,हे लोक किती थकलेत..? एवढ्या दूर परराज्यात पायी-सायकलवर कसे जाणार..? असे मनात प्रश्न येतात. मजुरांना बोलले तर सर्व यंत्रणा त्यांच्याशी कशी वागतेय..? ते कुठे कमी पडतात हे समजते..? या सर्वांचा उलगडा होतो. कोरोना अधिक कसा पोखरत चालला आहे, याची जाणीव होते.
काल सायंकाळी राहत केंद्र नगर-मनमाड बायपासला कराड जि. सातारा येथून पाटणा ,बिहार येथे सायकलवर जाणारे 16 मजूर आले. सायंकाळी आलेले मजूर पाणी-खिचडी खाऊन एका कोपऱ्याला अंतर ठेवून बसले. त्यांच्या हातापायात थोडे विसवल्यावर, अंगात ऊर्जा आल्यावर बोलते झाले. एक – एक जण कहाणी सांगायला लागला. मागील 2 महिने काम नाही. अन्न नाही. पुढे काय होणार ..? या प्रश्नाने भाड्याच्या खोल्या सोडून गावाकडे आम्ही निघालो आहोत. जायला वाहन नाही म्हणून कोणी व्याजाने तर कोणी उसने पैसे त्यांच्या मूळ गावातील लोकांकडून घेतले. त्या पैशांतून गावी जायचे साधन म्हणजे सायकली विकत घेतल्या. हे बहाद्दर या सायकलवर निघाले. बोलताना एक जण म्हणाला की, प्रवासात कोरोनामुळे कोणी थांबू देत नाही. रस्त्यावर मुक्काम करावा लागतो. अर्धपोटी-पाणी पिऊन सायकली चालवाव्या लागतात. कोणाकडून मदत मागितली तर लोक बोलत नाहीत. आम्हाला जास्त जवळ जाऊन बोलता येत नाही. सगळ्याच व्यथा होत्या. त्यांचे सुजलेले पाय – हात पाहून त्यांना हाताला- पायाला लावायला, आराम मिळावा म्हणून एका कार्यकर्त्याने तेल-तूप बाटली मजुरांना दिली. मजुरांनी हाताला तेल तूप पायाला लावले. यातून राहत बाबत त्यांना आपुलकी वाटली.
सर्व प्रवास सायकलीवर होणे अशक्य आहे हे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर पटले. सायकल प्रवास करताना प्रवासात असणारा धोका व स्वतःचा जीव सांभाळणे आवश्यक. हे त्यांना आम्ही पटवून सांगितले. उद्या सकाळी त्यांना महाराष्ट्र शासन बस उपलब्ध करून दिल्यास आपला काही शे किमी प्रवास बस ने होईल असे आम्ही त्यांना सांगितले. बस मिळु शकते या आशेवर मजूर रात्री मुक्कामी ‘राहत’ला थांबले. मजुरांना बस मिळवून देण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायचा असे आम्ही मनात ठरवले.
– *प्रशासन व बदललेला नियम* –
आज सकाळी आम्ही तारकपूर बस आगारात गेलो. तिकडे आम्हाला नवा जी.आर. आल्याचे समजले. त्यात आज पासून फक्त छत्तीसगड व मध्यप्रदेश चे आधारकार्ड असणाऱ्यांच मजुरांना बस मिळेल. याकरिता एकाच राज्यात जाणारे 22 मजूर हवे आहेत. तारकपूर स्टॅण्ड ला अनेक ठिकाणाहून आज 5 शे पेक्षा जास्त मजूर आले होते. राहत वरून आलेले सायकलवरील मजूर हे बिहार ला जाणारे होते. त्यांचे आधारकार्ड बिहारचे होते. यामुळे नियमानुसार त्यांना बस मिळणार नाही, असे आमच्या लक्षात आले. काल पर्यंत आपण बिहार,झारखंड,उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश,गुजरात व कर्नाटक ला बरेच मजूर पाठवले. आज शासनाने एकदम निर्णय बदलला. यामुळे सायकल दामटत आमच्या विश्वासावर आलेले मजूर स्टॅण्ड वर आले खरे.. पण त्यांना बस नाही मिळणार यामुळे मनातून आम्ही सर्वजण चरफडलो. मजूर एकत्र होऊन,अंतर पाळून एका झाडाखाली फूड पाकीट खात बसले. प्रशासनातील अधिकारी देखील नियमामुळे मदत करू शकत नसल्याने हळहळत होते. आम्ही मजुरांना काय बोलू..? म्हणून उत्तर शोधायला तहसीलदार व मनपा आयुक्त यांना भेटण्यास गेलो.
*चोर नही मजदूर हू*..!! –
डॉ.गिरीश बाबा व ऍड. श्याम भाऊ व आम्ही 2 कार्यकर्ते तहसीलदार यांना भेटण्यास गेलो. तिकडे गेल्यावर समजले की, 1200 मजूर यादी असेल तर ट्रेन मिळणार आहे. बस पाठवणे कमी केलेय. शासन ट्रेन सोडणार..? पण त्याला 1200 मजूर संपर्कात हवे आहेत. सर्व मजुरांची अमुक एका रकान्यात माहिती हवी आहे, असे आम्हाला तेथील लिपिकाने सांगितले. शिवाय 1200 मजुरांची यादी होणे व इतर बाबी पूर्ण होऊन ट्रेन मिळण्यासाठी मजुरांना 4 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे ,असे आम्हाला समजले.
यानंतर आम्ही अजून एक खटाटोप म्हणून मा.मनपा आयुक्त कार्यालयात गेलो. तिकडे मा.तडवी साहेब यांना भेटलो. त्यांनी प्रशासन या कोरोना महामारी समोर कसे थकलेय हे सांगितले. कोणतेच शासन निर्देश अद्याप मिळाले नाहीत असे सांगितले. यामुळे अशी यादी व इतर माहिती जमा करण्यास प्रशासनाला मदत मिळावी तर बरे होईल. आम्ही त्यांना मजुरांच्या याद्या मागितल्या व त्यांना कोणती मदत हवी आहे याची चौकशी करतो असे म्हणालो. आवश्यक मजुरांच्या याद्या साहेब यांनी लगेच उपलब्ध करून दिल्या. उलट आम्हाला काही मदत करता आली तर स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे , असे विनंतीवजा त्यांनी सांगितले. यानंतर आम्ही आणलेल्या
मजुरांना आता काय सांगायचे..? म्हणून तारकपूर ला आम्ही पुन्हा आलो.
मजुरांना मा.श्याम भाऊ व गिरीश बाबा यांनी झालेले सर्व प्रयत्न सांगितले. परिस्थिती ऐकून सायकलवर आलेले मजूर म्हणाले की, आप ने हमारे लिये खूब मेहनत की..! आप संस्था वाले लोग है.! आप तो सरकार नही.! हम चोर नही ,मजदूर लोग है.! असे म्हणून सर्वजण सायकलवर टांग मारून निघून गेले. बिहारचा रस्ता आम्ही शोधतो असे जाताना म्हणत मनमाड दिशेने गेले. खरेच आम्ही निरुत्तर झालो. काय करावे कळेना..?
1200 मजुरांची यादी ट्रेन साठी जमवणे हा पर्याय आता हाताशी उरलाय. एकूण सर्व परिस्थिती पाहिली तर असे वाटते की, परिस्थितीचा कोणालाच अंदाज नाही. काय करायचे हे कळत नाही. कोरोना पेक्षा हा *संभ्रम* अधिक धोकादायक वाटतोय. आज शेकडो मजूर संसार पोत्यात,गाठोड्यात भरून बस स्थानक, रेल्वे स्थानक ला आलेत.महामार्ग वर चालत आहेत, सायकली दामटत आहेत. सरकार या गर्दीपुढे फार तोकडे आहे. नेमकी मदत करणाऱ्यांना,स्वयंसेवी संस्था,दानशूर-संवेदनशील लोक यांना कशी मदत या लोकांना करावी..? हे कळत नाही.
खरे तर पाऊस सुरू होण्यापूर्वी ज्यांना परराज्यात जायचे आहे त्यांना तात्पुरता निवास देऊन नेमकी संख्या व वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या लांब पल्याच्या ठिकाणी सोडले पाहिजे. या मजुरांच्या व्यथाचा असंतोष झाला तर तो कोणालाच परवडणार नाही.